हिंदुत्व ,पुरोगामीत्व,देव यावर कांही मुद्दे विचारार्थ लिहितो. -राजीव लिपारे
1)हिंदुधर्म म्हणजे मनुवाद नव्हे, समजुतीमधील अशा गफलतींमुळेच पुरोगामी विचारसरणीत विकृती आलेली आहे व त्यांचा जनाधार लयास गेलेला आहे. पुरोगामी विचारसरणीचे लोक धर्म निरपेक्ष भूमिका सोडून जसजसे मुस्लिम व ख्रिश्चन अनुनयाची भूमिका घेऊ लागले तसतसा त्यांचा जनाधार ओसरत गेलेला आहे. अशा भूमिकांमुळेच बहुसंख्य समंजस हिंदू bjp कडे नाईलाजाने ढकलले गेले.
2)घटना समितीमधील 90% सदस्य हिंदू धर्म मानणारेच होते.हिंदुधर्म म्हणजे मनुवाद असता तर अशी धर्म निरपेक्ष व प्रत्येकाला प्रगतीची संधी देणारी घटना लिहिली गेली नसती.
3)मी जितके आंबेडकर वाचलेले आहेत त्यात मला त्यांची समंजस व विचारी भूमिकाच दिसलेली आहे, कोठेही द्वेष नाही. माझ्या विचारांचा विवेकानेच मागोवा घ्या, आंधळेपणाने शब्दप्रामाण्य मानू नका असे ते सांगतात. मात्र त्यांचे कांही अनुयायी त्यांच्या आडोशाने कडव्या माओ वादाकडे झुकलेले दिसतात हे दुर्दैव!
4) बाबासाहेबांसह सर्वच महापुरुष हे आपापल्या काळाच्या चौकटीत बंदिस्त असतात. त्यांचे शब्द व प्रासंगिक भूमिका या त्या त्या स्थळ, काळ व वेळ सापेक्ष असतात. या सर्व बाबी समजून घेतल्या तरच त्यांचे योग्य आकलन होते.
            हल्ली महापुरुषांचे एखादे वाक्य संदर्भ सोडून देऊन त्या आधारे विखारी प्रचार केला जातो.
5) बाबासाहेबांनी (कर्मठ ब्राह्मण वर्चस्ववादी वगळता) उर्वरित हिंदूंचा कधीही द्वेष केल्याचे दिसून येत नाही. उलट आपल्या सहका-यांचा विरोध पत्करून त्यांनी त्यांच्या ब्राह्मण मित्रांना चवदार तळे सत्याग्रहात सोबत घेतले होते.
6)मग ही विखारी व द्वेषाची भाषा येते कुठून?तर ती अगदी अलीकडच्या काळात मराठा विचारवंतांनी(?) जाणीवपूर्वक पसरविली असल्याचे दिसून येते.(उदा. पुरुषोत्तम खेडेकर यांचे ' मराठयांच्या इतिहासाची साधने ' हे पुस्तक इ.)
7) ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास हा जसा एकांगी आहे तसाच खेडेकर, कोकाटे इ.चा इतिहासही एकांगीच आहे. त्यांनी इतिहासातील मराठा जातीचे सर्व दोष पुसून ते ब्राह्मणांच्या माथी मारून नवी विकृती निर्माण केलेली आहे. खरेतर ब्राह्मण व क्षत्रिय(मराठा इ.) या दोघांनीं मिळून शूद्रांची पिळवणूक केलेली आहे.
          म्हणून ज्याला ईतिहास अभ्यासायचा आहे त्यास अनेक पुस्तके,अस्सल पत्रे व परकीय साधनांची मदत घेतली तरच समजेल.
8)कडवे पुरोगामी म्हणवणा-यांच्या दांभिकपणावर मी अनेक वेळा टीका केलेली आहे.
उदा.बामसेफ सारखी संघटना तिहेरी तलाक व बुरख्याबद्दल ' मुस्लिम धर्मात शासनाचा हस्तक्षेप नको ' अशी भूमिका घेते तो बाबासाहेबांच्या समानता व व्यक्तिस्वातंत्र्य या विचारांशी द्रोह नाही का?
9) अंधश्रद्धा व विकृती या सर्वच धर्मात (हिंदू, मुस्लिम, बौद्ध इ सर्व) आहेत. (बौद्ध धर्मातील अंधश्रद्धांवर वेगळी पोस्ट संदर्भीय पुस्तकांच्या नावासह नंतर लिहीन, आता विषयांतर होईल).
      म्हणून या विकृतींवर मात कशी करता येईल? या दिशेने सर्वांनीच प्रयत्न
 करायला हवेत.
10) जो पर्यंत माणसाच्या मनात काळजी, भीती व असुरक्षितता आहे तो पर्यंत देव व धर्म यांचे अस्तित्व राहणारच.(मी स्वतः उदात्त मानवी मूल्यांना देव मानतो) कांही हितसंबंधी लोक याचा गैरफायदा घेत असतात, हे सर्वत्रच घडते, ही बाब चुकीची असली तरी पूर्णपणे नष्ट होणे अशक्यप्राय आहे.
           म्हणूनच निखळ बुद्धिवादी व नास्तिक विचारसरणी ऐतिहासिक काळापासून अत्यल्पसंख्यच आहे व राहणार.
11)लोकशाही म्हणजे सहजीवन. म्हणून सर्व प्रकारच्या भिन्न विचारसरणींचे अस्तित्व मान्य करून समानता व व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकाधिक बाबींवर सहमती घडविण्याच्या दिशेने चालले पाहिजे.
12) म्हणूनच ' हिंदुत्व म्हणजे गुलामगिरी ' ही थीम लाईन घेऊन obc/ sbc ची कोणतीही संघटना बांधणे शक्य होणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे.
          Sbc संघर्ष समितीत सर्व राजकीय पक्षांचे समर्थक लोक आहेत. हिंदुत्ववादी, नास्तिकवादी, आंबेडकरवादी, कम्युनिस्ट इ. सर्व विचारसरणींचे लोक आहेत. Sbc संवर्गाचा उत्कर्ष या एकमेव ध्येयासाठी सर्व एकत्र आले आहेत.
          म्हणून सर्वांनी अगोदर कडवे हिंदूद्वेष्टे बना,नंतर संघटना बांधू या क्रमाने हे कार्य होणारे नाही.
 शेवटी  लिहिण्यालाही मर्यादा आहेच.  माझी भूमिका शक्य तितकी विस्ताराने लिहिली. वैचारिक कांही मुद्द्यांवर मतभिन्नता असली तरी आपण सर्व राजकीय व वैचारिक  भूमिका बाजूस ठेऊन 'sbc संवर्गाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न ' या उद्दिष्टांवर ठाम व एकसंघच राहूया.
       
     -राजीव लिपारे, कराड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भूमिका